ताज्या घडामोडी

*घरकुल व रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा – पीएम-जनमन व धरती-आबा योजनेच्या आढाव्यात जिल्हाधिकारी यांचे निर्देश*

गडचिरोली दि. २० : पंतप्रधान जनजातीय महासन्मान अभियान (पीएम-जनमन) अंतर्गत लाभार्थ्यांना दिलेले घरकुलांचे उद्दिष्ट सर्व यंत्रणा कामाला लावून पावसाळ्यापूर्वी म्हणजेच येत्या दोन आठवड्यांत जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
पीएम-जनमन व धरती-आबा योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागाीय अधिकारी, गट विकास अधिकारी व तहसिलदार बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत विविध विभागांच्या योजनांवर चर्चा करत शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे उद्दिष्ट प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले
गडचिरोली जिल्ह्यात पीएम-जनमन अंतर्गत एकूण ७००१ घरकुलांसाठी नोंदणी झाली असून, यापैकी ६,८७४ घरकुले मंजूर झाली आहेत. सध्या ६,३८६ घरकुलांना पहिल्या हप्त्याचा निधी, २,०२२ घरकुलांना दुसऱ्या हप्त्याचा निधी आणि १,०२४ घरकुलांना तिसऱ्या हप्त्याचा निधी वितरित झालेला आहे. पूर्ण झालेले घरकुलांची संख्या सध्या १,०२४ आहे. पावसाळ्यापुर्वी प्रगतीपथावरील घरे पूर्ण होतील, यासाठी प्राधाण्याने लक्ष देण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत आदिवासी वस्ती व पाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या १० रस्त्यांचे काम मंजूर झाले आहेत, मात्र यातील अनेक कामांना वनविभागाची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याने तसेच वन विभाग व कार्यान्वयन यंत्रणांमध्ये समन्वय अभावाची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत मुख्य वनसंरक्षकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांत अंतिम परवानगी घेऊन कामे सुरू करण्याचे निर्देश दिले.
मोबाईल मेडिकल युनिट्स संदर्भात चर्चा करताना, जिल्ह्यात १३ मोबाईल युनिट्सच्या माध्यमातून गरोदर मातांची तपासणी, टीकाकरण, सिकलसेल व क्षयरोग तपासणीसह विविध वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
धरती आबा योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४११ गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये वैयक्तिक लाभ योजना, आरोग्य तपासण्या, सौर ऊर्जेचे कनेक्शन, वनधन केंद्रांची उभारणी, आणि कृषीसंबंधित योजना राबविण्यात येत आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष देवून व जास्तीत जास्त कॅम्प घेवून कामात प्रगती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button