ताज्या घडामोडी

*ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारांबाबत जागरूकता वाढवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

*जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती समितीचा आढावा*
*बोगस डॉक्टर पकडण्यासाठी धाडसत्र राबविण्याचे निर्देश*
गडचिरोली, (जिमाका) दि. १ जुलै : ग्रामीण भागातील नागरिकांनी आजार झाल्यास अंधश्रद्धा आणि जादूटोण्यावर विश्वास न ठेवता तातडीने अधिकृत वैद्यकीय उपचार घ्यावेत, यासाठी व्यापक जनजागृती करून जागरूकता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भातील जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक श्री पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “अनेक नागरिक आजही आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे न जाता पुजाऱ्यांकडे जातात. हे पुजारी रुग्णांची दिशाभूल करतात. यामुळे उपचारासाठीचा महत्त्वाचा वेळ वाया जातो आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. ही सवय बदलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक आहे.”
महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवावी आणि नागरिकांना योग्य उपचार घ्यायला प्रवृत्त करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यामध्ये शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग घ्यावा, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक आणि ग्रामस्थांपर्यंत योग्य माहिती पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
, आशा वर्कर, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक व तलाठी यांनी जादूटोणासंबंधी घटनांची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना द्यावी. कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि कोरची या भागांमध्ये अशा प्रथांचे प्रमाण अधिक असल्याने यंत्रणेने विशेष लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या.

यावेळी बोगस डॉक्टरांच्या वाढत्या समस्येबाबतही चर्चा झाली. कोणतीही वैद्यकीय पात्रता नसलेल्या किंवा अधिकृत वैद्य म्हणून नोंद नसलेल्या व्यक्तींनी रुग्णांवर उपचार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत, अशा व्यक्तींविरोधात पोलीस व तालुकास्तरीय समितींनी संयुक्त धाडसत्र राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, नमन गोयल, कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी व संबंधीत अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button