ताज्या घडामोडी

*जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ चे उत्साहात उद्घाटन*

गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : गडचिरोली जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा – २०२६ चा उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अहेरी कुशल जैन, अमर राऊत आणि एम. अरूण यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी श्री नीलोत्पल यांनी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण आणि कार्यक्षमता वाढीस लागते, असे प्रतिपादन केले तर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केवळ प्रशासकीय कार्यापुरते मर्यादित न राहता क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. अशा स्पर्धांमुळे मानसिक ताण कमी होऊन आरोग्यदायी वातावरण निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी खेळाडूंनी क्रीडा शपथ घेतली. विविध क्रीडा प्रकारांसह सांस्कृतिक सादरीकरणांची रंगतदार सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील महसूल विभागातील विविध तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, स्पर्धा १६, १७ व १८ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत.

या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी अपर जिल्हाधिकारी नितीन गवंडे व संजय आसवले यांनी विशेष प्रयत्न घेतले.

उद्घाटन समारंभास महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button