ताज्या घडामोडी

*मार्कंडेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देणार*

गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री मा. ना. अ‍ॅड. आशिष जयस्वाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज मार्कंडा (ता. चामोर्शी) येथील धार्मिक, जल व कृषी पर्यटनाच्या एकात्मिक विकासाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस आमदार तथा राज्याचे माजी मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. “विदर्भाची काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी या बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले.
बैठकीत ‘देवस्थान विकास टप्पा क्रमांक २’ अंतर्गत प्रलंबित कामे तात्काळ सुरू करणे, घाटांचे मजबुतीकरण करणे, स्वच्छता व्यवस्था सक्षम करणे तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रकाश व्यवस्था व इतर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच चिचडोह बॅरेज परिसराचा जल पर्यटनासाठी नियोजनबद्ध विकास करून मार्कंडा–चिचडोह–कृषी पर्यटन असा एकात्मिक पर्यटन परिपथ उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला.
या विकासामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच मार्कंडाच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचा व्यापक प्रसार करण्यासाठी राज्यस्तरीय “मार्कंडा महोत्सव” आयोजित करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.
या बैठकीस पुरातत्व विभाग, सांस्कृतिक संचालनालय, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विकास आराखड्याला मान्यता देत गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्धता दर्शवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button