ताज्या घडामोडी

*सुरक्षित प्रसूतीसाठी जिल्हास्तरावर पावसाळी नियोजनाचे निर्देश — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली विविध आरोग्य समित्यांच्या बैठका*

*अहेरी महिला रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे निर्देश*

*टेलीमेडिसीन, मलेरिया, टीबीवर ठोस उपायांची गरज अधोरेखित*

गडचिरोली, ४ जुलै : पावसाळी कालावधीत मातांचा आणि बालकांचा जीव धोक्यात येऊ नये, याकरिता राबविण्यात येत असलेल्या आवश्यक उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरिय गाभा समिती, नियमित लसीकरण समिती आणि ‘स्टॉप डायरिया कॅम्पेन’ आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सुरक्षित प्रसूती, अर्भक मृत्यू, घरगुती प्रसूती, बालकांचे लसीकरण, कुपोषण, मलेरिया, टीबी व अहेरी महिला रुग्णालयाच्या प्रगतीसह विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

*सुरक्षित प्रसूतीसाठी ‘माहेर घर’*

पावसाळ्यात रस्ते बंद होणे, दळणवळणात अडथळे निर्माण होणे व आरोग्य सुविधा पोहचविण्यात अडचणी येणे अशा पार्श्वभूमीवर, पुढील तीन महिन्यांत प्रसूती होण्याची संभाव्यता असलेल्या महिलांना ‘माहेर घर’ मध्ये आणून सुरक्षित संस्थात्मक प्रसूती सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. घरगुती प्रसूती टाळण्यासाठी तालुकास्तरावर सजगता बाळगण्याचे आणि गरजेनुसार वाहन व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.

*बालमृत्यू कारणांचा शोध घ्या*

अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘बालमृत्यू सभा’ आयोजित करून त्या मृत्यूमागील अचूक कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशा कारणांवर आधारित उपाययोजना राबवून भविष्यातील प्रसंग टाळण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

*कुपोषित बालकांसाठी विशेष उपाययोजना*

जिल्ह्यातील मध्यम व तीव्र कुपोषित बालकांना तात्काळ नुट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर (NRC) मध्ये भरती करून आवश्यक उपचार द्यावेत. उपचारानंतर सुटी मिळाल्यावरही त्या बालकांचा सातत्याने पाठपुरावा करावा, जेणेकरून ते पुन्हा कुपोषणात सापडणार नाहीत. महिला व बालकल्याण विभागामार्फत अशा बालकांना सकस व चौरस आहार दिला जावा. पावसाळ्यातही अंगणवाड्यांमार्फत प्रत्येक कुटुंबापर्यंत आहार पोहोचवला जावा याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

*दत्तक पोषण निरीक्षण उपक्रम*

ज्या तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त आहे, तेथील गट अ व गट ब संवर्गातील अधिकारी एकेक बालक ‘दत्तक’ घेतील. त्या बालकाच्या पोषण स्थितीवर वैयक्तिक लक्ष ठेवून पुनः कुपोषण टाळण्याचा प्रयत्न केला जाईल. हा उपक्रम स्वयंप्रेरणेने राबवून अधिकारी बालकांच्या पुनर्वसनात मोलाची भूमिका बजावण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

*१०० टक्के लसीकरणासाठी मोहीम राबवावी*

कुपोषण आणि बाल मृत्यू टाळण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी अंगणवाडी सेविकांनी आरोग्य विभागास सक्रिय सहकार्य करावे. पावसाळ्यातील लसीकरण सत्रात सर्व लसी उपलब्ध असाव्यात, यासाठी आधीच नियोजन करावे. विजेचा पुरवठा खंडित झाल्यास लसींच्या सुरक्षित साठवणीसाठी पर्यायी व्यवस्था ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

*अतिसारासाठी औषधसाठा आणि जनजागृती*

अतिसार (डायरिया) वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक आरोग्य केंद्रात ओआरएस आणि झिंकच्या गोळ्यांचा मुबलक साठा ठेवण्याचे आदेश देण्यात आले. जनजागृतीद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यावर भर देण्यात आला.

मलेरिया तपासणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी

रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाची मलेरियाची तपासणी होणे अत्यावश्यक असून, ही तपासणी न केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यात मलेरियामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते, यामुळे प्रत्येक रुग्णाची तपासणी बंधनकारक करण्याचे त्यांनी सांगितले. यावर तालुका आरोग्य अधिकारी यांनी ग्रामीण भागात जाऊन प्रत्येक गावकऱ्यांची तपासणी करावी तसेच आश्रमशाळांमध्येही तपासणीसाठी विशेष भेट द्यावी, अशा सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिल्या.

*टीबीवरील नियंत्रणासाठी गावागावात तपासणी*

टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता, जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन एक्स-रे मशीनच्या मदतीने तपासणी करावी. लॅब टेक्निशियनच्या जागा भराव्यात, जेणेकरून तपासणीत अडथळा येणार नाही. एकही टीबी रुग्ण निदानाविना राहू नये, यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे निर्देश देण्यात आले.

*दुर्गम भागात टेलीमेडिसीन सुविधा*

बहुतांश दुर्गम भागात इंटरनेट सुविधा निर्माण होत आहे तेथे टेलीमेडिसीन सेवा कार्यान्वित करण्यात यावी. इंटरनेट सेवा उपलब्ध नसलेल्या ठिकाणांची यादी करून येथे प्राधान्याने इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

*अहेरी महिला रुग्णालयाच्या प्रगतीबाबत नाराजी*

अहेरी येथील महिला रुग्णालयाचे काम पूर्ण न झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. काम लवकरात लवकर पूर्ण करून रुग्णालयाचे उद्घाटन करावे, तसेच आतापर्यंत खर्च झालेला निधी आणि उर्वरित निधीची गरज याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे त्यांनी सांगितले.

*यंत्रणांनी एकत्रित आणि समन्वयाने कार्य करण्याची गरज*
सुरक्षित प्रसूती, बालकांचे संपूर्ण लसीकरण, कुपोषण निर्मूलन आणि पावसाळी आजारांपासून प्रतिबंध यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रित आणि समन्वयाने कार्य करण्याची गरज लक्षात घेता या सर्व बाबींवर तात्काळ कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button