ताज्या घडामोडी

*जिल्ह्यात खत पुरवठा सुरळीत; सिरोंच्यासह सर्व तालुक्यांत मुबलक साठा*

गडचिरोली, ४ जुलै: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा करण्यासाठी कृषी विभाग गडचिरोली सज्ज आहे. जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२५ या पहिल्या तिमाहीत विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा झाला आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीकडून ११०० मेट्रिक टन २०:२०:०:१३ ग्रेड खताचे वितरण करण्यात आले आहे, युरियाचा संरक्षित साठा २७७ मेट्रिक टन इतका असून किरकोळ विक्रीसाठी १०० टन अतिरिक्त युरिया उपलब्ध करण्यात आला आहे. कृषीधन, कृषी देव, कृषी उद्योग यांसारखी मिश्र खते देखील जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील बाजारात उपलब्ध आहेत.

जुलै महिन्यातील ‘रेक प्लॅन’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी २४०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा निश्चित असून, त्यापैकी एक रॅक २ जुलै रोजी वडसा येथे दाखल झाली आहे. पुढील आठवड्यात RCF कंपनीकडून १२०० मेट्रिक टन युरियाची रॅक येणार असून, त्यानंतर कोरोमंडल कंपनीकडून २०:२०:०:१३ ग्रेड खताची रॅक १० ते १२ जुलै दरम्यान पोहोचणार आहे.

*सिरोंचा तालुक्यात विशेष भर*

सिरोंचा तालुक्यात यंदा सुरुवातीला वाहतुकीच्या अडचणी आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता काहीसा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, कृषी विभागाने खत कंपन्या आणि ट्रान्सपोर्ट एजन्सीजसोबत समन्वय साधून सदर अडथळ्यांवर मात केली आहे.

२ जुलै रोजी आलेल्या वडसा रॅकमधून सिरोंच्यासाठी १०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. यानंतर ८ ते १० जुलै दरम्यान येणाऱ्या RCF रॅकमधून सिरोंच्यासाठी १५० मेट्रिक टन युरिया तर १० ते १२ जुलै दरम्यान येणाऱ्या कोरोमंडल रॅकमधूनही गरजेनुसार पुरवठा केला जाणार आहे.

सध्या सिरोंचा तालुक्यात युरिया – ८२४ मेट्रिक टन, डीएपी – २५ टन आणि एनपीके कॉम्प्लेक्स – ७४५ टन इतका साठा उपलब्ध असून, आज दिनांक ४ जुलै रोजी वडसा येथून आणखी १०० मेट्रिक टन युरियाचा पुरवठा सुरू आहे.

डीएपी खताला पर्यायी खत वापराबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे. कृषी अधिकारी आणि तंत्रज्ञ शेतकऱ्यांना एसएसपी, कृषीधन, कृषी देव यासारख्या पर्यायी स्फुरदयुक्त खतांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

जिल्ह्यातील कोणत्याही भागात खत टंचाई जाणवू नये यासाठी कृषी विभाग सतत सज्ज असून, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तालुकास्तरावर वेळेवर खत पोहोचवले जात आहे. किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधून प्रत्येक तालुक्यात नियमित साठा राखला जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कळविले आहे.
०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button