ताज्या घडामोडी

*मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘महास्ट्राइड’ परिषदेत गडचिरोली जिल्ह्याचा विकास आराखडा सादर*

*जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे प्रभावी सादरीकरण*

*वर्ल्ड बँक व ‘मित्र’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आय.आय.एम. नागपूर येथे परिषद*

गडचिरोली, दि. २९ जून : ‘मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरल डिस्ट्रीक्ट्स (मित्र) ‘ व जागतिक बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय जिल्हाधिकारी परिषदेत ‘महास्ट्राइड’ उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वर्ल्ड बँक प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयआयएम नागपूर येथे केले.

“नव्या दृष्टीकोनातून गडचिरोली – आकांक्षांपासून कृतीकडे” या संकल्पनेवर आधारित सादरीकरणात त्यांनी जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक रूपांतरणाचा आराखडा मांडला. नागपूर विभागातून महास्ट्राइडसाठी निवड झालेला गडचिरोली हा एकमेव जिल्हा होता.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणात गडचिरोलीच्या विकासाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, सध्या जिल्ह्याचे एकूण उत्पन्न ₹१०,९२१ कोटी असून ते २०२८ पर्यंत ₹२७,३०३ कोटींवर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच, प्रति व्यक्ती उत्पन्न सध्याच्या ₹१,४०,८६० वरून दुप्पट म्हणजेच ₹२,८०,३२० पर्यंत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात गडचिरोली जिल्ह्याचे योगदान सध्या ०.४५ टक्के असून ते ०.७ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यासोबतच गडचिरोली जिल्ह्याची ‘स्टील नगरी’कडे वाटचाल, सेंद्रिय शेती, वनउपज व पर्यटन विकास, बँकिंग व सामाजिक सुरक्षा सेवा, जलसंपत्ती व मत्स्य व्यवसाय, जीआयएस आधारित योजना व अंमलबजावणी प्रणाली आदी विषयांवरही त्यांनी विकास आराखड्याची माहिती दिली.

राज्य शासनाच्या ‘मित्र’ (मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरल डिस्ट्रीक्ट्स) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ‘महास्ट्राइड’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथील आयआयएम सभागृहात काल झाला. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरण केले.

या परिषदेत महास्ट्राइड उपक्रमांतर्गत प्रत्येक विभागातून एका जिल्ह्याची निवड सादरीकरणासाठी करण्यात आली होती.
गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासह, वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस., धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. किर्तीकिरण पुजार, जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे या सहा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महास्ट्राइड उपक्रमाला राज्याच्या परिवर्तनाचे माध्यम ठरवून जिल्ह्याचा विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर व राणा जगजीतसिंह पाटील, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना व राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे प्रतिनिधी मारचीन पियाटकोस्की यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button