ताज्या घडामोडी

*चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन*

गडचिरोली, २८ जून : चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे येत्या ३० जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता उघडण्यात येणार आहेत. यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होणार असून, नदीलगतच्या भागांमध्ये पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज हे चामोर्शी मुख्यालयापासून ५ किमी उत्तरेस आणि प्रसिद्ध मार्कंडा तीर्थक्षेत्रापासून ४ किमी अंतरावर स्थित आहे. जून २०१८ मध्ये पूर्ण झालेल्या या बॅरेजची एकूण लांबी ६९१ मीटर असून, यामध्ये १५ मी. X ९ मी. आकाराचे ३८ लोखंडी दरवाजे बसविण्यात आले आहेत. हे दरवाजे दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आले होते.

सध्या बॅरेजमधील पाणीपातळी १८१.८० मीटर असून, जलसाठा ३८.५७ दशलक्ष घनमीटर इतका आहे. या प्रकल्पातून तळोधी-मोकासा उपसा सिंचन योजनेच्या चाचणीसाठी १८१ मीटर पातळी राखण्यात आली होती. परंतु गोसिखुर्द धरणातून ८० क्युमेक्स विसर्ग होणार असून, तसेच पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक येवामुळे बॅरेजच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅरेजमधील साठवलेला पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी ३० जून रोजी सकाळी ८ वाजता ३९०.१० क्युमेक्स इतका विसर्ग उभ्या दरवाजांद्वारे व नदीच्या खालील भागातील रिव्हर स्लूइस मार्गे टप्याटप्याने सोडण्यात येणार आहे.

या कालावधीत नदीकाठावरील भागात पाणीपातळी वाढण्याची शक्यता असून, जीवित वा वित्तहानी होऊ नये म्हणून चिचडोह बॅरेजच्या आजूबाजूच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच शेतात काम करताना दक्षता घ्यावी. मार्कंडा देवस्थान परिसरातील यात्रेकरू, नदीत आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, रेती उत्खनन करणारे, पशुपालक व नदीतून ये-जा करणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button