ताज्या घडामोडी

*वृक्ष लागवडीसाठी सुक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी*

*हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानाअंतर्गत जिल्ह्यात एक कोटी अकरा लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट*

गडचिरोली, दि. 17 : राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन वर्षात १ कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले असून सर्व शासकीय व खाजगी संस्थांसोबतच लोकचळवळीतून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियान अंतर्गत वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक एम. रमेश, श्री कार्तिक, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, कुशल जैन, नमन गोयल, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत असल्यामुळे शासनामार्फत एक कोटी वृक्षलागवड तर लॉईड मेटल्स या कंपनीद्वारे अकरा लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना श्री पंडा यांनी दिल्या. वृक्षारोपणात किमान दिड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्याचे, रोपे लावल्यावर ती जगतील व वाढतील यासाठीदेखील विशेष प्रयत्न व नियोजन करण्याचे तसेच भविष्यात वृक्षरोपणासाठी नर्सरीत रोपे विकसित करण्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत रेशीम विभाग, वनविभाग, कृषी विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम,जलसंपदा, सामाजिक वनिकरण, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आदी शासनाचे विविध विभाग तसेच सामाजिक संस्था यांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.
यावेळी विविध विभागांचे संबंधीत अधिकारी तसेच समाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button