*जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पुर्ततेची 29 जुलै रोजी विशेष मोहीम*
गडचिरोली, दि. 25 (जिमाका) : शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 29 जुलै 2025 रोजी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोलीमार्फत ही मोहीम त्रुटी पूर्ण करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राबवली जात आहे.
अनु.जाती (SC), इमाव (ST), एसईबीसी (SEBC) व इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करून समितीकडे पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. या प्रस्तावांवर समितीने आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून दिनांक 17 जुलै 2025 पर्यंत बहुतांश प्रकरणांचा निकाल दिला आहे. तथापि, काही प्रकरणांमध्ये त्रुटी असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे शक्य झाले नाही.
या पार्श्वभूमीवर, 29 जुलै 2025 रोजी “विशेष त्रुटी पूर्तता मोहीम” आयोजित करण्यात आली असून, ज्या विद्यार्थ्यांना अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, त्यांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रतींसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,ज्ञडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. चौक, एल.आय.सी. रस्ता, गडचिरोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी.
त्रुटी अभावी कोणतेही प्रकरण प्रलंबित राहिल्यास किंवा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अर्जदाराची असेल. त्यामुळे सर्व संबंधितांनी विहीत दिवशी आवश्यक त्या दस्तावेजांसह उपस्थित राहून कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.
0000