ताज्या घडामोडी

*’महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू…* *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*

मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविणे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत त्यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या आवाहनाला ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न आता मिशनमोडवर साकार होतांना दिसत आहे.

‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे. ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नसून, हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.

या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा नागपूर येथे 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी, येथून शुभारंभ होणार आहे.

या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदान, उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर नागपूर, गोंदिया, अकोला, वर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास 700 मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो. यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येते. वेळीच उपचार केले नाहीत तर कान बधिर होणे, बोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा येऊ शकतो. तथापि या विकारावर उपचार असून 6-7 शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते. या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच संवेदशील नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे, यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी केवळ उपचारच नव्हे, तर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो कुटुंबांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे. अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या समस्येवर आता तज्ज्ञांच्या मदतीने प्रभावी उपचार मिळणार आहे.

स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यातील मुलांमध्ये जन्मजात आलेले दुभंगलेले होठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण नक्कीच जागणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button