*विदेशी शेतीचा अभ्यास दौरा – पात्र शेतकऱ्यांसाठी अर्जाची संधी*
गडचिरोली, दि. २९ (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक व प्रगत शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी कृषी विभागामार्फत विदेश दौऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे. सन २०२५-२६ साठी गडचिरोली जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना या विशेष संधीचा लाभ मिळणार आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, एक केंद्र किंवा राज्य कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी अथवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन शेतकऱ्यांचा समावेश असेल.
या अभ्यास दौऱ्यांत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, चीन आणि दक्षिण कोरिया या देशांचा समावेश असून शेतकऱ्यांना प्रगत शेती तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची आणि शिकण्याची संधी मिळणार आहे.
*निवडीसाठी पात्रतेचे निकष*
लाभार्थी शेतकरी स्वतःच्या नावे चालू ७/१२ व ८-अ उतारा (मागील ६ महिन्यातील) सादर करणे आवश्यक.
शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे आणि यासंदर्भात स्वयंघोषणापत्र (प्रपत्र-२) सादर करणे बंधनकारक.
अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक.
एकाच शेतकरी कुटुंबातील केवळ एकालाच या योजनेचा लाभ मिळणार.
आधारकार्डाची प्रत व शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक.
सहलीच्या दिवशी किमान वय २५ वर्षे पूर्ण असावे.
शारीरिक तंदुरुस्तीबाबत किमान एमबीबीएस डॉक्टरचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे.
वैध पासपोर्ट असणे आवश्यक असून, दौऱ्याच्या दिवशी त्याची किमान तीन महिने वैधता शिल्लक असावी.
शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरी करणारे तसेच डॉक्टर, वकील, सीए, अभियंते, कंत्राटदार यांना अर्ज करता येणार नाही.
*अनुदानाचा तपशील*
शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये (जे कमी असेल ते) अनुदान म्हणून मिळणार आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचना व विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून संपूर्ण भरलेला अर्ज ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावा.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
०००