ताज्या घडामोडी

*“तंत्रज्ञान, समूहशक्ती आणि योजनांची प्रभावी सांगड घालून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवूया” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, दि. २७ (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, सौर ऊर्जेचा वापर, नैसर्गिक शेतीची दिशा आणि शासकीय योजनांची एकत्रित अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. रब्बी व उन्हाळी हंगामातील क्षेत्रवाढीसाठी जलसंधारण, सूक्ष्म सिंचन आणि समूहशेती पद्धती प्रभावी ठरेऋ असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिभना येथे
प्रत्यक्ष शेतभेटीत सोलर लाईट सापळा योजनेची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतांना केले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी गटांच्या माध्यमातून योजना राबविल्यास त्याचा अधिक व्यापक आणि शाश्वत परिणाम होतो. कृषी विभाग, आत्मा आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून शेतकरी हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर दिला जाईल. “शाश्वत शेती आणि तंत्रज्ञानाधारित शेती हीच भविष्यातील दिशा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर जिल्हाधिकारी यांनी श्री भोजराज राजीराम जेन्गठे यांच्या शेताला भेट देऊन त्यांनी लागवड केलेल्या विविध भाजीपाला पिकांचे निरीक्षण केले. भोजराज जेन्गठे यांनी सांगितले की, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये १५ युवा शेतकऱ्यांचा “शाश्वत अन्नदाता शेतकरी गट” स्थापन करण्यात आला. या गटामार्फत सौर चलित ऊर्जा कुंपण योजना राबवून रब्बी व उन्हाळी हंगामातील पिक क्षेत्रात वाढ करण्यात आली. तसेच गटाने सोलर लाईट सापळा योजना स्वीकारल्यामुळे पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला असून फवारणी व महागड्या औषधांवरील खर्चात बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी विलास जेन्गठे यांनी नैसर्गिक शेतीविषयी माहिती देताना सांगितले की, आत्मा अंतर्गत कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे प्रशिक्षण घेऊन गट नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करत आहे. तसेच हैद्राबाद येथे जैविक निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे विविध पिकांच्या क्षेत्रात वाढ झाल्याचेही शेतकऱ्यांनी नमूद केले.

यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हेमंत उंदिरवाडे, उपकृषी अधिकारी सुनील बुद्धे, सहाय्यक कृषी अधिकारी कु. पाटेकर, शेतकरी गटाचे अन्नाजी जेन्गठे तसेच इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button