ताज्या घडामोडी

*मुलांचे-मुलींचे प्रत्येकी २५० क्षमतेचे दोन स्वतंत्र वसतिगृह उभारणार*

*समाज कल्याण विभागाला ५०० विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी ५६ कोटींची मंजुरी*

*दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षणाची संधी; दोन ते तीन वर्षांत पाच मजली सुसज्ज इमारती होणार उभ्या*

गडचिरोली, दि. २६ : दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागामार्फत गडचिरोली शहरात मुलांसाठी व मुलींसाठी प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर करण्यात आली आहेत. या दोन्ही वसतिगृहांच्या उभारणीसाठी प्रत्येकी २८ कोटी रुपये, असा एकूण ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील उच्च शिक्षणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र पाच मजली भव्य इमारती उभारण्यात येणार असून, त्यामध्ये एकूण ५०० विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था उपलब्ध होईल. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज निवास व्यवस्था, भोजनाची सुविधा, अभ्यासिका, स्वच्छता सुविधा, सुरक्षित वातावरण तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जिल्हा मुख्यालयी येतात. मात्र राहण्याची व जेवणाची सुविधा, सुरक्षित निवासाची कमतरता आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवणे कठीण जाते. नवीन वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना अल्प खर्चात सुरक्षित व दर्जेदार निवास उपलब्ध होणार असून, त्यांना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.

या सुविधेमुळे विशेषतः ग्रामीण, दुर्गम व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ व खर्च कमी होण्याबरोबरच शिक्षणातील गळती कमी करण्यास आणि उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.

समाज कल्याण विभागाच्या नियोजनानुसार पुढील दोन ते तीन वर्षांत या दोन्ही वसतिगृहांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी त्या सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे.

याबाबत माहिती देताना सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले की, “गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात अनेक विद्यार्थी केवळ राहण्याच्या सुविधेअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. नवीन वसतिगृहे सुरू झाल्यानंतर ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, भोजन आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल आणि जिल्ह्यातील उच्च शिक्षण अधिक सक्षम होईल.”

समाज कल्याण विभागाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुलभ होणार असून, शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button