*युरोप, चीनमधील शेतीचा अभ्यास करण्याची सुवर्णसंधी; राज्य पुरस्कृत विदेश अभ्यास दौऱ्यासाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करा*
गडचिरोली, दि. ६ (जिमाका) : राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे – राज्य पुरस्कृत योजना” अंतर्गत सन २०२६-२७ साठी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती पद्धती, तंत्रज्ञान, उत्पादन व्यवस्थापन व कृषी नवकल्पनांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
यंदाच्या वर्षी या योजनेत युरोप आणि चीन या देशांतील कृषी अभ्यास दौऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, गडचिरोली जिल्ह्यातून एकूण पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये एक महिला शेतकरी, एक केंद्र अथवा राज्य कृषी पुरस्कारप्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी आणि इतर तीन शेतकरी यांचा समावेश असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा स्वतः शेतकरी असणे, त्याच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असणे, अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे, कुटुंबातून केवळ एका व्यक्तीस लाभ मिळणे, वैध पासपोर्ट असणे तसेच शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खाजगी संस्थेत नोकरी करणारा नसावा तसेच डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, अभियंता, कंत्राटदार आदी व्यावसायिक नसावा. संबंधित शेतकऱ्याने यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अर्थसहाय्याने विदेश अभ्यास दौरा केलेला नसावा.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल २ लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.
इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचना व विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण भरलेला अर्ज दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले असल्याचे कृषी उपसंचालक मधुगंगा जुलमे यांनी कळविले आहे.


