*पीक विमा व अन्न प्रक्रिया योजनांना लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*
गडचिरोली, दि. २५ जुलै २०२५ : शेतकऱ्यांसाठी संकट काळात आधार ठरणाऱ्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पीक विमा योजना आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी खोमणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले प्रामुख्याने उपस्थित होते.
खरीप हंगाम २०२५ साठी सुरू असलेल्या सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अर्ज नोंदणीचा आढाव्यात अर्ज संख्येमध्ये अपेक्षित वाढ दिसून येत नसल्यामुळे, जिल्हाधिकारी पंडा यांनी एकही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्व ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक बँक प्रतिनिधींना अर्ज नोंदणी वाढवण्यासाठी यथोचित उपाययोजना करण्याचे व ग्रामस्तरावर जनजागृती, मदत केंद्रांची स्थापना, बँक व कृषी विभागाच्या माध्यमातून अर्ज प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले.
*प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती योजना ग्रामीण उद्योगासाठी संधीचे दार*
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नती (PMFME) या योजनेत बँक प्रक्रियेतील विलंबामुळे अंमलबजावणीत संथ गती आहे, हे लक्षात येताच जिल्हाधिकारी पंडा यांनी नाराजी व्यक्त करत सर्व बँक शाखा प्रमुखांना प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले.
ग्रामीण भागात नवउद्योजकांना चालना देणारी ही महत्त्वाची योजना असून यामार्फत शेती आधारित लघुउद्योग, महिला बचत गट, तरुण उद्योजक यांना अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक बळकटी दिली जाते.या योजनेबाबत जनजागृती वाढवण्याचे आणि शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रियेत सहकार्य करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी उपसंचालक मधुगंधा जुलमे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक किशोर झाडे, तसेच आत्मा, कृषी, बॅंक, व बिमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.