गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा धोका: नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गडचिरोली, २४ जुलै, २०२५: भारतीय हवामान विभाग (IMD), नागपूरने गडचिरोली जिल्ह्यासाठी २४ जुलैकरिता ऑरेंज अलर्ट आणि २५ जुलैकरिता रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तसेच २५ जुलै रोजी अत्याधिक मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज, २४ जुलै रोजी जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
याव्यतिरिक्त, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी येलो/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, ज्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन:
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोलीतर्फे नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना पुढील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
पुराच्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
अतिवृष्टीच्या काळात नदी, तलाव, बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ जाणे टाळावे आणि पर्यटकांनी उचित सतर्कता बाळगावी.
सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.
नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी.
नदी/नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडू नये.
जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
आपत्कालीन मदत आणि माहितीसाठी संपर्क:
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा:
दूरध्वनी: ०७१३२-२२२०३१ / ०७१३२-२२२०३५
मोबाइल: ९४२३९११०७७ / ८२७५३७०२०८ / ८२७५३७०५०८
मान्सून कालावधीतील पावसाची आकडेवारी, बंद रस्त्यांची माहिती, धरण व नद्यांची पाणी पातळी/विसर्ग, तसेच हवामान अंदाज इत्यादी अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या व्हॉट्सॲप चॅनलला फॉलो करा:
व्हॉट्सॲप चॅनल लिंक: https://whatsapp.com/channel/0029VbAPkzTKGGG8KdTvgY41