ताज्या घडामोडी

मुंबई, दि. 18 : राज्यात यंदा 11 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्यात 1 कोटी 10 लाख आणि पालघर जिल्ह्यात 1 कोटी 10 लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे दोन्ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागाने आराखडा तयार करून रोपे उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.
वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात वन विभागाच्या विविध बैठका झाल्या. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी बैठकीस वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वन बल प्रमुख शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, श्री. रामाराव, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झिरमुरे, मुख्य वन संरक्षक रविकिरण गोवेकर, उपसचिव विवेक होशिंग यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
वन मंत्री गणेश नाईक म्हणाले की, गडचिरोली व पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. ही कामे होत असताना जिल्ह्यातील वृक्ष संपदाही वाढली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 1 कोटी 10 लाख झाडे लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये साग, चंदन आदी झाडे लावण्यात यावीत. तसेच प्रत्येक वन परिक्षेत्रात 100 एकरावर साग व चंदनाची झाडे लावण्याचे नियोजन करण्यात यावे.
गडचिरोली व पालघर या दोन्ही जिल्ह्यात तसेच राज्यात 11 कोटी झाडे लावताना ती देशी असावीत याकडे लक्ष देण्यात यावे. तसेच एवढे मोठे उद्दिष्ट गाठण्यासाठी रोपे पुरविण्यासाठी वन विभागाच्या रोपवाटिका (नर्सरी) सक्षम करावे. गरज पडल्यास कृषि विद्यापीठे, खासगी नर्सरीचीही मदत घ्यावी. जांभूळ, वड, पिंपळ, बकुळी, प्राजक्त, बांबू, साग, चंदन आदी झाडे लावण्यात यावीत. ही झाडे किमान तीन वर्षे वयाची असतील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
व पालघर जिल्ह्यातील वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जागा शोधणे, रोपे निवडणे आदी कामे वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
०००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button