ताज्या घडामोडी

*पीएम जनमन आणि धरती आबा योजनेअंतर्गत जिल्ह्यात १५ ते ३० जूनदरम्यान १२६ संतृप्ती शिबिरे* *अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन*

गडचिरोली, दि. १६ : आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JUGA) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दिनांक १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष संतृप्ती शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू करण्यात आलेल्या धरती आबा मोहिमेअंतर्गत १७ मंत्रालये आणि विभागांच्या माध्यमातून २५ उपक्रम राबविले जात असून आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधा संतृप्त करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये एकूण १२६ संतृप्ती शिबिरांचे सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. यात सिरोंचा येथे ४, मुलचेरा ५, अहेरी १८, एटापल्ली १३, भामरागड १३, धानोरा ७, आरमोरी ४, गडचिरोली ३, देसाईगंज २८, कुरखेडा ४, कोरची ९ आणि चामोर्शी येथे १८ शिबिरांचा समावेश आहे.

या शिबिरांमध्ये अनुसूचित जमातीच्या नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यामध्ये नवीन आधार कार्ड व दुरुस्ती, मतदार ओळखपत्र नोंदणी व दुरुस्ती, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र, मनरेगा अंतर्गत जॉबकार्ड, रेशनकार्ड नोंदणी, बँक खाते उघडणे, वैयक्तिक वनहक्क दावे, आयुष्यमान भारत कार्ड, किसान क्रेडीट कार्ड व पीएम किसान कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना अर्ज, वनधन विकास केंद्राचा लाभ, सौरऊर्जा व गॅस कनेक्शन, विविध विमा योजना तसेच आरोग्य विभागामार्फत सिकलसेल व अ‍ॅनेमिया तपासणी अशा सेवांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह या शिबिरांमध्ये उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि या सशक्तीकरण मोहिमेत सहभागी व्हावे. तसेच अधीक माहितीकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी) व नमन गोयल (भामरागड) यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button