*लघु व मध्यम उद्योग उभारणीसाठी गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या संधी उपलब्ध – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, (जिमाका) दि. २४ डिसेंबर :
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्याच्या पायाभूत विकासासह आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम ठरू शकते. लघु व मध्यम उद्योगासाठी गडचिरोली जिल्ह्यातील संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
बँक ऑफ इंडिया, नागपूर यांच्या वतीने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नवोद्योगक व उद्योजकांसाठी आज आर. के. सेलेब्रेशन हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे एमएसएमई क्षमतानिर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यशाळेचा उद्देश जिल्ह्यातील उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करणे, नवोद्योगकांना बँकिंग सुविधा, शासकीय योजना, तंत्रज्ञान व बाजारपेठेच्या संधींबाबत सखोल माहिती देणे हा होता.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आपल्या भाषणात गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने, कृषी व वनउत्पादनांवर आधारित उद्योग, शिल्पकला, प्रक्रिया उद्योग तसेच नवोद्योगांसाठी असलेली मोठी संधी यांचा उल्लेख केला. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, औद्योगिक सुविधा आदी पायाभूत बाबींमध्ये सातत्याने विकास होत असून त्याचा लाभ उद्योग क्षेत्राला होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग उभारणीसाठी बँकिंग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून बँकांनी नवोद्योगकांना अधिकाधिक वित्तीय सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास सचिन शेंडे, क्षेत्रीय संचालक, रिझर्व बँक ऑफ इंडिया, नागपूर, जय नारायण, आंचलिक प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, अंजना शामनाथ, उपमहाप्रबंधक, रिझर्व बँक ऑफ इंडिया, निलेश गायकवाड, महाप्रबंधक, जिल्हा उद्योग केंद्र, भास्कर जाधव, क्षेत्रीय प्रबंधक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, चंद्रपूर तसेच बँक ऑफ बडोदा व इतर बँकांचे प्रतिनिधी, सार्वजनिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रिझर्व बँक ऑफ इंडिया, नागपूरचे क्षेत्रीय संचालक श्री. सचिन शेंडे यांनी गडचिरोलीच्या विकासासाठी उद्योग क्षेत्राचा पायाभूत विकास व त्यासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक नियोजनाचे महत्त्व विशद केले. बँक ऑफ इंडिया चे आंचलिक प्रबंधक श्री. जय नारायण यांनी प्रास्ताविकात उद्योग क्षेत्रात परिश्रम, ज्ञान व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित करत एमएसएमई क्षेत्रातून रोजगारनिर्मिती व संसाधननिर्मिती साध्य होऊ शकते, असे नमूद केले.
कार्यशाळेत जिल्ह्याचा क्षमता विकास, बँकिंग संज्ञा व योजना, जागतिक बाजारपेठेतील संधी, वीज व तंत्रज्ञान तसेच एमएसएमई क्षेत्रासाठीच्या शासकीय योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटदार वर्ग, दुर्गम वनवासी भागातील शिल्पकार, राईस मिलसह विविध औद्योगिक क्षेत्रांचे प्रतिनिधी तसेच बँक ऑफ इंडिया अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर-सेटी प्रकल्पाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या उपमहाप्रबंधक श्रीमती अंजना शामनाथ यांनी नवोद्योगकांनी पुढे येऊन नवीन उद्योग सुरू करावेत, असे आवाहन करत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
—


