ताज्या घडामोडी

*ग्राहक संरक्षणासाठी डिजिटल प्रणालीचा वापर आवश्यक – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

*राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा*

गडचिरोली, (जिमाका) दि. २४ :
बदलत्या डिजिटल युगात ग्राहक संरक्षणासाठी डिजिटलीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट प्रणाली, ई-तक्रार नोंदणी तसेच तंत्रज्ञानाधारित सेवा यामुळे व्यवहारात पारदर्शकता येऊन ग्राहकांना जलद व सुलभ सेवा मिळते, असे त्यांनी नमूद केले. ग्राहकांनी खरेदी करताना बिल घेणे, सेवा व वस्तूंच्या दर्जाबाबत जागरूक राहणे आणि तक्रारी असल्यास अधिकृत मंचावर नोंद करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज गोंडवाना कला केंद्र, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्राहक हक्क, तक्रार निवारण व्यवस्था तसेच डिजिटल साधनांचा प्रभावी वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा, वजन-मापे नियमांचे पालन, स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. ग्राहक हक्कांविषयी जागरूकता वाढविणे ही काळाची गरज असून, शासनाच्या विविध डिजिटल उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला तहसीलदार सागर कांबळे, शिरीष कापडे (सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी), ॲड. माधुरी आटमांडे (सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली), प्रवीण घाटे (अशासकीय सदस्य), प्रा. अरुण पा. मुन्घाटे, उदय धकाते, विजय मुसनवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन गडचिरोली), आंबेकर मॅडम (तालुका पुरवठा अधिकारी, गडचिरोली), देवानंद फुलझेले (वजन-मापे अधिकारी), दीपक चौधरी (स्वस्त धान्य दुकानदार संघटना), विजय शृंगारपवार, चंद्रकांत पतरंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून ग्राहक हक्कांविषयी जनजागृती होऊन ग्राहक संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button