ताज्या घडामोडी

*महिला बचत गटांच्या उत्पादनांची विक्री व प्रदर्शनी : २३ ते २६ ‘सरस’ महोत्सवाचे आयोजन*

गडचिरोली, (जिमाका) दि. २२ डिसेंबर :
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरीय ‘सरस’ विक्री व प्रदर्शनीचे आयोजन दि. २३ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

या विक्री व प्रदर्शनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ६० महिला स्वयंसहायता गटांचे स्टॉल सहभागी होणार असून, महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री येथे केली जाणार आहे. यामध्ये मध, जांभूळ व सिताफळ प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, मोहापासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ, लाकडी शोभेच्या वस्तू, कुक्कुटपालन व मत्स्यपालनाशी संबंधित उत्पादने यांचा समावेश आहे. तसेच पीएमएफएमई योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी उत्पादनेही येथे उपलब्ध असतील.

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांचे शहरी बाजारपेठेतील विक्री अनुभव मिळणार असून, लघुउद्योगांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न उमेद अभियानांतर्गत सुरू आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना घडणार आहे.

प्रदर्शनात महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेली लोणची, चटण्या, लाकडी हस्तकला वस्तू, वनउपजापासून निर्मित खाद्यपदार्थ, ग्रामीण कलाकुसरीची उत्पादने, घरगुती मसाले, पापड, कुरडई तसेच इतर स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल असतील. यासोबतच सावजी मटन, बंगाली फिश, बंगाली स्वीट्स, तसेच भामरागड, एटापल्ली, कोरची या दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.

या ‘सरस’ विक्री व प्रदर्शनामुळे ग्रामीण नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळणार असून, नागरिकांना अस्सल ग्रामीण चव चाखण्याची व खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सदर महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

तरी सर्व नागरिकांनी या जिल्हा स्तरीय भव्य ‘सरस’ विक्री व प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button