पोलीस म्हणजे माणूसच ना… त्यालाही मायेचा पाझर फुटतोच.

आठ दिवसांपूर्वी रात्री उशिरा गडचिरोली पोलीस ठाण्यात एक फोन आला. साहेब, गडचिरोली बसस्थानकात एक वृद्ध महिला आणून सोडली आहे. ती एकाच जागी पडून आहे. क्षणाचाही विलंब न करता पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी आपली टीम घेऊन घटनास्थळी धाव घेतली. थकलेली, अशक्त अवस्था पाहताच त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू झाले. सोबतच तिच्या नातेवाईकांचा शोधही सुरू झाला. मात्र अनेकांनी थेट सांगून टाकले आम्ही तिला ओळखत नाही.
आपल्याकडे जेव्हा पद, पैसा, प्रतिष्ठा असते तेव्हा अनेक जण आपले होतात. पण जेव्हा आयुष्यात वाईट वेळ येते, तेव्हा माणूस एकटा पडतो. हे कटू सत्य आहे. जन्म देणाऱ्या आईला आपण इतकं बेवारस कसं सोडू शकतो, याचा विचारही मनाला चटका लावणारा आहे. एखादं झाड आयुष्यभर गोड फळ देतं. त्याच्या सावलीत आपण लहानाचे मोठे होतो. पण तेच झाड थकलं, वाकलं, म्हातारं झालं, तर आपण ते तोडून टाकायचं का?
चव्हाण साहेबांनी त्या वृद्ध महिलेसाठी वृद्धाश्रम आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधला. मात्र ती महिला अतिशय अशक्त होती. हातपाय हलत नव्हते. तिला सांभाळण्यास कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व नर्स यांना तिची काळजी घेण्याची चव्हाण यांनी विनंती केली. चार-पाच दिवसांनी डॉक्टरांचा फोन आला. साहेब, त्या महिलेचं निधन झालं आहे.
चव्हाण साहेबांनी पुन्हा एकदा तिच्या नातेवाईकांना फोन केला. मृत्यूची माहिती दिली. पण प्रतिसाद हृदय पिळवटून टाकणारा होता…आम्ही येणार नाही. तुम्हीच पाहून घ्या. ना कुणाचं नातं, ना कुणाची साथ. शेवटी तिच्या अंतिम प्रवासासाठी पुढे आले पोलीस दादा आणि गडचिरोली नगरपरिषदेचे कर्मचारी.
कर्तव्य आणि माणुसकी यांची सांगड घालत, त्यांनी त्या अनोळखी मातेला शेवटचा खांदा दिला. शेवटचा निरोप दिला. अंतिम संस्कार करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते.
यामध्ये पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण (गडचिरोली पोलीस ठाणे), पोलीस योगेश कोरवते, अजय कोल्हे, गडचिरोली नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पीदुरकर, वैभव कागदेलवार (आरोग्य विभाग), राजू मधुमटके, स्वप्निल निमगडे (स्वच्छता विभाग), मोरेश्वर मडावी, किशोर पोहनकर, किशोर मुनघाटे, सुखीराम मेश्राम, लोमेश देशमुख. यांनी तिच्यावर अंतिम संस्कार केले…
-तुषार वांढेकर


