*नायलॉन मांजा वापरल्यास ५० हजार तर विक्री केल्यास २.५ लाखांचा दंड*
*५ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयात आक्षेप नोंदवण्याची संधी*
गडचिरोली दि. २६ : नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे प्राणघातक अपघात आणि पक्ष्यांची होणारी जीवितहानी रोखण्यासाठी मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सार्वजनिक सूचना जारी करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक आर्थिक दंडाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
*प्रस्तावित दंडात्मक कारवाई*
उच्च न्यायालयाने खालीलप्रमाणे दंड आकारण्याचे प्रस्तावित केले आहे:
* अल्पवयीन मुलांसाठी पालकांना दंड: जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळला, तर त्याच्या पालकांना ५०,००० रुपये दंड का करू नये, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
* प्रौढ व्यक्तींना दंड: कोणतीही प्रौढ व्यक्ती नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास, तिला ५०,००० रुपये दंड भरावा लागू शकतो.
* विक्रेत्यांवर मोठी कारवाई: ज्या विक्रेत्यांकडे नायलॉन मांजाचा साठा आढळेल किंवा जे याची विक्री करतील, त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी २,५०,००० रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे.
*जनतेला म्हणणे मांडण्याची संधी*
न्यायालयाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार, ही कारवाई अंतिम करण्यापूर्वी जनतेला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. ज्यांना या प्रस्तावित दंडात्मक कारवाईविरुद्ध निवेदन सादर करायचे आहे, ते ५ जानेवारी २०२६ रोजी मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहून आपले म्हणणे मांडू शकतात. जर कोणीही सुनावणीला हजर राहिले नाही, तर जनतेचा या दंड वसुलीस कोणताही आक्षेप नाही, असे मानले जाईल.
नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला आहे.



