ताज्या घडामोडी

*गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन*

*एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक*

*श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद*

गडचिरोली दि. 18 : दुबई येथे पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी तथा दिव्यांग खेळाडू कु. श्वेता कोवे हिने पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई करत देशाचे आणि जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाज माध्यमावरून तिचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात श्वेता कोवेच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि आत्मविश्वासाला सलाम करत तिचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले आहे. दुर्गम भागातून आलेल्या एका तरुणीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकदार कामगिरी करत पदके पटकावणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर विश्वास ठेवत श्वेताने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल १४ देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने सुवर्ण व कांस्य पदक पटकावले.

भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या श्वेता कोवेच्या या यशामुळे दुर्गम व आदिवासी भागातील असंख्य मुला-मुलींना नवी दिशा, आशा आणि आत्मविश्वास मिळाला असून तिची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button