राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज घोषणा
मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली.निवडणुकीच्या घोषणेमुळे आता २९ पालिका हद्दीत आजपासून आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्याने राजकीय पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
मुदत संपलेल्या २७ आणि २ नव्या महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज आयोगाकडून करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईनच घेतले जातील, असे आयोगाकडून सांगण्यात आले. उमेदवाराला ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक करण्यात आले आहे. आयोगाकडून मुंबईसह राज्यातील महापालिकेची तयारी संदर्भात माहिती दिली.
नामनिर्देशन पत्र ऑफलाइन सादर करावे लागणार
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की, ‘उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र ऑफलाइन घेण्यात येईल. यासाठी राजकीय पक्षांची बैठक झाली होती. त्यात मागणी केली होती. जातवैधता पडताळणीसाठी राखीव गटाच्या उमेदवारांना जात वैधता आणि जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी सादर अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा दिला तरी स्वीकारला जाईल. सहा महिन्याच्या आत सादर करण्याचे हमीपत्र आणि सादर न केल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल’.
निवडणूक कार्यक्रम –
मुंबई आणि इतर महापालिका
उमेदवारी अर्ज स्वाकीरणे – २३ डिसेंबर – ३० डिसेंबर
छाननी – ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार – २ जानेवारी २०२६
चिन्ह वाटप – अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
मतदान – १५ जानेवारी २०२६
निकाल – १६ जानेवारी २०२६
आचारसंहिता आजपासून लागू
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आता राज्यातील २९ पालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आचारसंहितेचं उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.


