गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणूका आंबेडकरी राजकीय पक्ष संयुक्तपणे लढविणार सहविचार सभेत झाला एकमुखी निर्णय – समितीची केली घोषणा

गडचिरोली नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणूका एकत्रितपणे लढविण्याचा एकमुखी निर्धार शहरातील सर्व आंबेडकरी राजकीय पक्ष व सामाजिक संगठनानी घेतला आहे.
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी येथील केमिष्ट भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या भरगच्च सभेत हा निर्णय प्रचंड टाळ्यांच्या गजरात घेण्यात आला. आणि गडचिरोलीच्या आंबेडकरी राजकीय क्षेत्रात एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यात आली.
सभेत गडचिरोली शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संगठना तसेच कर्मचारी अधिकारी संगठना व कामगार संगठना आणि समाज मंडळांचे प्रतिनिधी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
गडचिरोली येथील ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते रोहिदास राऊत यांनी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ कैलास नागराळे होते.
सभेत बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाष्कर मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, आझाद समाज पार्टीचे नेते धर्मानंद मेश्राम, बिआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे, बहुजन मुक्ती मोर्चाचे प्रमोद राऊत या प्रमुख राजकीय पक्षांसोबतच भारतीय बौद्ध महासभेचे प्रा. गौतम डांगे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिक डांगे, संविधान फॉउंडेशनचे गौतम मेश्राम, स्वतंत्र मजूर युनियनचे देवानंद फुलझेले, बोधी वृक्ष समिती चे तुळशीदास सहारे, जेष्ठ नागरिक संघटनेचे भीमराव शेंडे, प्रबुद्ध विचार मंचाचे बंडूभाऊ खोब्रागडे, बुद्धा फाउंडेशनचे रामनाथ खोब्रागडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी रोहिदास राऊत यांनी नगर परिषद निवडणूक सर्व आंबेडकरी पक्षांनी एकत्रितपणे लढविण्या बाबत भूमिका विशद करून तसा प्रस्ताव सभेपूढे ठेवला आणि त्याला उपस्थित सर्व राजकीय पक्ष आणि संगठनांच्या प्रतिनिधींनी सर्वंकष व प्रदीर्घ चर्चा करून संपूर्ण पाठिंबा दर्शवला आणि हा प्रस्ताव सर्वसंमतीने टाळ्यांच्या गजरात आणि घोषणांच्या निनादात पारित करण्यात आला.
संपूर्ण निवडणुकांच्या संचलनासाठी 35 जनाची एक समिती सुद्धा सर्व संमतीने जाहीर करण्यात आली आणि या समितीवर पुढील कार्यक्रमांची जबाबदारी सोपविण्यात आली. रोहिदास राऊत व डॉ नागराळे याना या समितीचे प्रमुख निमंत्रक म्हणून जाहीर करण्यात आले.
सभेत ऑटो रिक्षा युनियनचे मोहनलाल मोटघरे, ई रिक्षा युनियन चे विजय दुर्गे , सोनापूर विहार समितीचे प्रशांत बाबु खोब्रागडे, सम्यक बुद्ध विहारचे प्रदिप भैसारे, रामनगर चे सिद्धार्थ गोवर्धन ,फुलेवाड प्रशांत खोब्रागडे, नवेगाव विहार महादेव निमगडे, संविधान चौक सुखदेव वासनिक, आंबेडकर चौक उत्तम मोटघरे,राहुल वनकर, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सुरेखाताई बारसागडे, डॉ अंकिता धाकडे, विसापूर वार्डाचे संजय मेश्राम, वैशाली वनकर शहरातील सर्वच वॉर्डातील समाज मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
निवडणूक एकत्रितपणे लढविण्याच्या निर्णय बद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करून संपूर्ण ताकतीने निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
