*जिल्ह्यात रासायनिक खताचा पुरवठा आता महसूलमंडळ निहाय*
गडचिरोली दि. 21 : जिल्ह्यात भात पिकाच्या रोवणीला सुरवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खते खरेदी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने वितरण व्हावे व शेतकऱ्यांची फसवणूक होवू
नये यासाठी कृषि विभागाकडून जिल्ह्यात भरारी पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात एक पूर्णवेळ गुणनियंत्रण निरीक्षकाची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खतेखरेदी
करतांना दक्षता घेणे आवश्यक आहे. अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खतेखरेदी
करावीत. पावतीवरील संपूर्ण तपशील तपासून घ्याव्यात. विक्रेत्यांनी ज्यादा दर आकारल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथील तक्रार निवारण कक्षात लेखी स्वरुपात तक्रार करावी.
जिल्ह्यामध्ये संतुलित खत पुरवठा करण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करत आहे
त्यानुसार जिल्ह्यात सध्यस्थितीत इफको २०:२०:०:१३ १७८५ मे.टन, नर्मदा २०:२०:०:१३ १००० मे
टन, कोरोमंडल २०:२०:०:१३ ७०० मे टन, इफको डीएपी ९१८ मे.टन, एनएफएल युरिया ६०० मे.टन
इत्यादी खतांच्या रेक लागत असून त्याचे नियोजन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या
महसूल मंडळनिहाय करण्यात आले असून रेक पॉइट वर जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी यांचे
नियंत्रण जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
000