*जागतिक युवा कौशल्य विकास दिनी प्रशिक्षणार्थींना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप*

गडचिरोली, (जिमाका) दि. 15 जुलै 2025: जागतिक युवा कौशल्य विकास दिनाचे औचित्य साधून आज गडचिरोली येथे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातील उमेदवारांना प्रमाणपत्र व स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच वाटप करण्यात आला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी विनामूल्य स्पर्धापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो. आज, 15 जुलै 2025 रोजी, जागतिक युवा कौशल्य विकास दिनानिमित्त या प्रशिक्षणार्थींना त्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यासोबतच, त्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणारी पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला.
या संचामध्ये इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांमुळे प्रशिक्षणार्थींना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल आणि त्यांच्या यशाची शक्यता वाढेल] अशी अपेक्षा प्रमुख अतिथींद्वारे व्यक्त करण्यात आली.