*जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम – नागरिकांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नागरिकांना आवाहन*

गडचिरोली, दि. १६ : केंद्र शासनाच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आर्थिक समावेशन संपृक्तता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा उद्देश ग्रामीण व दूरदूरच्या भागांतील नागरिकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणे आणि केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे हा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज बँक प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सर्व बँकांना ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे तसेच नागरिकांनी या मोहिमेमार्फत उपलब्ध होणाऱ्या सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. विशेषतः विमा व पेन्शनसारख्या सामाजिक सुरक्षेच्या योजनांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत शून्य शिल्लक रकमेवर जनधन खाती उघडणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच अटल पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी करणे, जुनी व निष्क्रिय बचत खाती पुन्हा सुरु करण्यासाठी रि-केवायसी करणे, डिजिटल फसवणुकीपासून बचाव आणि रिझर्व बँकेच्या दावा न केलेल्या ठेवींवर दावा करण्याची प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत ढोंगले, तसेच जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खासगी आणि ग्रामीण बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशांत ढोंगले यांनी या मोहिमेचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, प्रत्येक बँकेला विशिष्ट गाव नेमून देण्यात आले असून, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी ग्रामसेवक, तलाठी व ग्राहक सेवा केंद्रांचे सहकार्य घेतले जाईल. नागरिकांनी अधिक माहितीसाठी जवळच्या बँक शाखेशी किंवा जिल्हा अग्रणी बँक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.