*व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी अनुदान; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
*ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा व शासकीय यंत्रणांना संधी*
गडचिरोली, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्यामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळेचे बांधकाम, इनडोअर व्यायाम साहित्य व ओपन जिम (खुली व्यायामशाळा) साहित्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये आवश्यक साहित्य पुरवठा धारकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतो.
क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून क्रीडांगण समपातळीकरण, २००/४०० मीटरचा धावपट्टी तयार करणे, विविध खेळांची प्रमाणित क्रीडांगणे उभारणे, प्रसाधनगृह, भांडारगृह बांधणे, पाणीपुरवठा सुविधा तसेच सुरक्षा कुंपण (भिंत अथवा तारांचे) उभारण्यास अनुदान दिले जाते.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, महाविद्यालये, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, ग्रामपंचायती व इतर शासकीय यंत्रणांनी दिनांक ३० जुलै २०२५ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः गावपातळीवरील नागरीकांना शारीरिक स्वास्थ्य व क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ग्रामपंचायतींनी खुल्या व्यायामशाळांसाठी, तर आदिवासी शासकीय आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांनी क्रीडांगण विकासासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत.
या योजनांबाबत अधिक माहिती व अर्जाचा विहीत नमुना प्राप्त करण्यासाठी इच्छुक संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.