*संभाव्य पूरस्थिती निवारणासाठी प्रत्येक विभागाने ठोस नियोजन करावे : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्यात मान्सून कालावधीत संभाव्य पूरस्थितीचा विचार करता, प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्यांनुसार आपत्ती निवारणासाठी ठोस पूर्वनियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मानसी, कुशल जैन, नमन गोयल, रणजित यादव, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पूरप्रवण ठिकाणांची यादी तयार करून त्या भागांमध्ये उपायोजना व दक्षता बाबत जनजागृती करावी. पूरस्थिती आणि इतर आपत्तीजनक प्रसंगांमध्ये विभागीय समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने आपापल्या कार्यक्षेत्रात जबाबदाऱ्या निश्चित करून त्वरित कृती करावी. गावपातळीवर स्थानिक तरुण, तैराक व स्वयंसेवकांची यादी तयार ठेवावी आणि आवश्यक धान्यसाठा ठेवावा. नदीनाल्यांवरील छोटे पूल व रस्ते दुरुस्त करून साफसफाई करावी. अतिक्रमणामुळे रस्ते बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. सर्पदंशासाठी तसेच इतर आजारांसाठी आवश्यक औषधांचा साठा सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून ठेवावा.
ग्रामपंचायतींनी विहीर, हँडपंप आणि पाणवठ्यांची स्वच्छता करून पिण्याच्या पाण्याजवळ सांडपाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपालिकेने शहरांमध्ये लावलेली अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटवावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर शहरी व ग्रामीण रस्त्यांची कामे संबंधित यंत्रणेने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी काम पूर्ण होणे शक्य नसेल, तिथे पर्यायी उपाययोजना कराव्यात.
नदीकिनाऱ्यावरील गावांना धोक्याचा इशारा वेळेवर देण्यात यावा. वाहतूक संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये अन्नधान्य, औषधसाठा वेळेवर पोहोचवावा आणि त्या गावांतील पुढील चार महिन्यांत प्रसूती अपेक्षित असलेल्या महिलांची यादी तयार करून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्याचे व त्यांच्या औषधोपचार व जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी दिल्या. तसेच आरोग्य केंद्रांमध्ये मेंदूज्वर, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांसाठी आवश्यक औषधसाठा ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मान्सून कालावधीत परवानगीशिवाय पाण्यात बोट, होडी, डोंगा घेऊन जाण्यास मनाई राहील. रस्त्यावरून पुलावरून पूराचे पाणी जात असताना वाहन चालवू नये, दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी गावोगावी स्वच्छतेविषयी बैठका घ्याव्यात व जनजागृती करण्यचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी पूरपरिस्थितीत उद्भवणारे संभाव्य धोके आणि विभागनिहाय राबवायच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. जलसंपदा विभागाचे उपअभियंता गणेश परदेशी यांनी विविध प्रकल्पांतील पाण्याची पातळी आणि विसर्गाबाबतची माहिती दिली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, भूसंपादन अधिकारी प्रसेनजीत प्रधान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, सिंचन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस, विद्युत आणि इतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000