गडचिरोली जिल्ह्यातील विशेष दत्तक संस्थेमुळे अनेकांना मिळाले हक्काचे पालकत्व

महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त गडचिरोली जिल्ह्यातील विशेष दत्तक संस्था सप्टेंबर 2024 मध्ये नोंदणीकृत झाली. काही दिवसांतच संस्थेने आपले कार्य सुरू केले, जेव्हा पहिल्या सापडलेल्या बालकाला या संस्थेत दाखल करून त्याच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू झाली.
गेल्या एका वर्षापासून लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित विशेष दत्तक संस्था, बजरंग नगर, हनुमान मंदिराच्या मागे, गडचिरोली येथे कार्यरत आहे. ही संस्था 0 ते 6 वर्षे वयोगटातील अनाथ, निराश्रित, सापडलेली, अनैतिक संबंधातून जन्मलेली बेवारस बालके तसेच आत्मसमर्पण केलेल्या कुटुंबातील बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक, व आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणे, मानसिक व शारीरिक विकलांग बालकांची काळजी घेणे, संरक्षण करणे, आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
विशेष दत्तक संस्थेतील कार्यामुळे दिनांक 27 एप्रिल 2025 ला या संस्थेतील पाचवे बालकाचे दत्तक विधान प्रक्रिया पार पाडण्यात येऊन त्याला दत्तकपूर्व परिपोषणासाठी नागपूर येथील पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या कार्यामुळे अनेक निपुत्रिक पालकांना हक्काचे पालकत्व प्राप्त झाले आहे, आतापर्यंत संस्थेने पाच बालकांना दत्तकपूर्व परिपोषणासाठी पालकांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे.
दत्तक विधान प्रक्रियेबाबत संस्थेचे अधिक्षक श्री. नशिब जांभुळकर यांनी सांगितले की, इच्छुक पालक www.cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून कायदेशीर पद्धतीने मूल दत्तक घेऊ शकतात. यामुळे अनाथ व निराश्रित बालकांना हक्काचे पालक मिळून त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळते.
याप्रसंगी मा. श्री. अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, मा. डॉ. निखिल चौहान महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली, आणि संस्थेचे अधिक्षक श्री. नशिब जांभुळकर यांच्या हस्ते बालकाचे दत्तक हस्तांतरण झाले. यावेळी अधिपरिचारिका कु. डिंपल सहारे, तसेच संस्थेच्या आया व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
या यशस्वी उपक्रमासाठी विशेष दत्तक संस्थेचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली, आरोग्य विभाग, आणि संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाने मोलाचे सहकार्य केले.