ताज्या घडामोडी

*कोया कृषी कुंभ कृषी महोत्सवात भव्य खरेदीदार–विक्रेता संमेलन* *२० ते २२ कंपन्या व शेतकरी गटांचा उत्स्फूर्त सहभाग, १० करार संपन्न*

गडचिरोली, (जिमाका) दि. ०९ : शेतकरी आणि बाजारपेठ यांतील मध्यस्थ दूर करून थेट व्यापाराला चालना देण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे आयोजित कोया कृषी कुंभ कृषी महोत्सवात भव्य खरेदीदार–विक्रेता संमेलन पार पडले. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना (पीएमएफएमई), कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाला शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संमेलनात जिल्ह्यातील जवळपास २० ते २२ कंपन्या व शेतकरी गटांनी सहभाग नोंदवला असून १० थेट करार करण्यात आले. तांदूळ, विविध डाळी, कडधान्य, मोहफूल, चारोळी, मका, मसाले व हळद आदी कृषी उत्पादनांबाबत करार झाले. यावेळी कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन, प्रक्रिया व विपणन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
नक्षलग्रस्त व दुर्गम अशी ओळख पुसत गडचिरोलीचा शेतकरी आता थेट राज्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत असल्याचे चित्र या संमेलनातून दिसून आले. संमेलनास उपस्थित जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी, खरेदीदारांना दर्जेदार माल उपलब्ध व्हावा आणि विक्रेत्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केल्याचे स्पष्ट केले.
प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे आणि व्यापाऱ्यांना उच्च दर्जाचा माल उपलब्ध करून देणे असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) संकल्पनेला बळ मिळाले असून, समूहाने व्यवहार केल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो, हे प्रत्यक्ष अनुभवास आले.
राईस मिलर गडचिरोली, कृषिकोन्नती आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी (वरोरा), कांचणी फार्मर प्रोड्युसर कंपनी (वरोरा), झेष्टीवाल लिमिटेड (पुणे), ओज बहुउद्देशीय संस्था (वरोरा) आदी कंपन्यांनी थेट गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button