*गडचिरोली जिल्हा युवा पुरस्कार जाहीर; राहुल वैरागडे व सपना लाडे यांची निवड*
गडचिरोली, दि. 29 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण 2012 अंतर्गत व राज्य युवा धोरण 2012 अन्वये जिल्ह्यातील युवक व युवतींच्या समाजहिताच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरावर “जिल्हा युवा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्यातर्फे सन 2023-24 या वर्षासाठी पुरस्कारार्थींची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी युवक विभागात श्री. राहुल संजय वैरागडे (रा. भेंडाळा, ता. चामोर्शी) आणि युवती विभागात कु. सपना सुधाकर लाडे (रा. कोरेगाव, ता. देसाईगंज) यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही पुरस्कारार्थींना प्रत्येकी रु.10,000/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार दि. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या समारंभात, पोलीस मुख्यालय, परेड मैदान, गडचिरोली येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
श्री. राहुल संजय वैरागडे यांनी पाणपोई उभारणे, सामान्य ज्ञान स्पर्धांचे आयोजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, वनराई बंधारा बांधणे, पक्षी संवर्धन, वृक्षारोपण, वनसंवर्धन, कोरोनावरील जनजागृती पथनाट्य सादरीकरण, क्रीडा स्पर्धा आयोजन, मतदार जनजागृती, रक्तदान शिबीर, पूरग्रस्त मदतकार्य, स्वच्छता मोहीम व अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला आहे.
तर कु. सपना सुधाकर लाडे यांनी आरोग्य शिबिरे, “केच द रेन” अभियान, स्वयंसेवक नोंदणी, अॅनिमिया तपासणी कॅम्प, “माझी माती माझा देश”, “हर घर तिरंगा”, जल जीवन मिशन, पक्षी संवर्धन, वृक्षारोपण, कोविड-१९ लस शिबिरे, तालुका क्रीडा स्पर्धा, मतदार जनजागृती, व्यसनमुक्ती, स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलन, पोषक आहार प्रचार असे विविध उपक्रम राबवले आहेत.
या दोन्ही युवक-युवतींच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन 2023-24 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी दिली आहे.