*गडचिरोलीच्या कायापालटासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची ग्वाही*

गडचिरोली दि.२६: गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकासातून कायापालट करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले. अहेरी येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित आदिवासी लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यास आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अहेरीचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन, गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नमन गोयल, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, आदिवासी विकास मंडळाचे महाव्यवस्थापक किरण गाडे, तसेच अंबरीश आत्राम, प्रशांत वाघरे, प्रकाश गेडाम आणि डॉ. नामदेव उसेंडी उपस्थित होते.
मंत्री अशोक उईके यांनी पुढे सांगितले की, आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योजनांबद्दल लाभार्थ्यांना समजावून सांगून त्यांच्या सूचना ऐकून घेऊन त्या अंमलात आणण्याचे त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पात्र व गुणवत्ताधारक शिक्षक नेमले जातील, तसेच प्रत्येक आदिवासी शाळेत बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक नियुक्त करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. स्वच्छतेसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि प्रत्येक शाळेची स्वच्छता सुनिश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष मोहीम राबवून आदिवासी आश्रमशाळांमध्ये १०० टक्के प्रवेश मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विभागाच्या यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी न्युक्लिअस बजेट अंतर्गत आदिवासी समाजाच्या कौशल्यविकासासाठी उपयुक्त योजना राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे आवाहन केले. अंबरीश आत्राम यांनीही आदिवासींच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश व विविध योजनांची माहिती दिली. मेळाव्यात बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शेती अवजारे वाटप, प्रशिक्षित उमेदवारांना अर्थसहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना सायकल वाटप अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांना प्रत्यक्ष धनादेश देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
आदिवासी विकास मंत्री उईके यांनी यावेळी लाभार्थ्यांसोबत स्नेहभोजन करून त्यांच्या आनंदात सहभागी झाले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी लाभार्थी व नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.