*मलेरिया निर्मूलनासाठी गडचिरोलीत शासन-प्रशासनाची शंभर टक्के साथ: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची ग्वाही*

गडचिरोली, दि. २६ एप्रिल – गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या मलेरिया रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने येथे मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सला पुढील तीन वर्षांत मलेरिया निर्मूलनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक निधीची हमी तसेच लोकचळवळीत शासन आणि प्रशासनाचा शंभर टक्के सहभाग राहील, असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
मलेरिया दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयोजित आढावा बैठकीत मंत्री उईके बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव तसेच कुशल जैन आणि नमन गोयल उपस्थित होते.
यावेळी डॉ. अभय बंग यांनी सांगितले की, राज्यातील एकूण मलेरिया रुग्णांपैकी निम्मे रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार गडचिरोलीसाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्याद्वारे आगामी तीन वर्षांसाठी ठोस नियोजन करण्यात येत असून, त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.