*गडचिरोलीतील ४३ आश्रमशाळांमध्ये आज रात्री अधिकाऱ्यांचा मुक्काम*
गडचिरोली, ७ फेब्रुवारी २०२५: राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सुविधांबाबत थेट पाहणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील ४३ शासकीय आश्रमशाळांमध्ये आज रात्री (७ फेब्रुवारी) अधिकारी मुक्काम करणार आहेत.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या निर्देशानुसार, हा उपक्रम राज्यभरातील ४९७ शासकीय आश्रमशाळांमध्ये राबवला जात आहे. गडचिरोलीतील या विशेष मोहिमेत सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी) आणि नमन गोयल (भामरागड) यांच्यासह अनेक अधिकारी सहभागी झाले आहेत.
*विद्यार्थ्यांशी थेट संवाद आणि सुविधा पाहणी*
ही संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्या राहण्याच्या सुविधा, भोजन, सुरक्षा आणि आरोग्याच्या स्थितीवर भर देऊन राबवली जात आहे. अधिकाऱ्यांनी रात्रभर आश्रमशाळांमध्ये मुक्काम करून विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेण्याचे नियोजन केले आहे.
अधिकाऱ्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर आश्रमशाळांमध्ये पाणीपुरवठा, वीज, आरोग्यसेवा, सुरक्षाव्यवस्था आणि शिकवण्याची पद्धत कशी आहे, याची तपासणी केली जाणार आहे.
*तपासणी अहवाल आणि पुढील कृती*
याबाबतचा सविस्तर अहवाल प्रपत्र ‘अ’ आणि ‘ब’ मध्ये भरून, आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पाहणीच्या आधारे शाळानिहाय सुधारणा आराखडा तयार करून त्यानुसार आवश्यक बदल करण्याची योजना आखली जाईल.
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली प्रकल्प कार्यालय अंतर्गत 24, अहेरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत 11 आणि भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गत आठ अशा एकूण 43 आश्रम शाळा आहेत. या सर्व ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आज रात्री मुक्कामी आहेत.
नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी या मोहिमेअंतर्गत नागपूर विभागातील ७६ शासकीय आश्रमशाळांमध्ये अधिकाऱ्यांना मुक्कामाचे आदेश दिले आहेत.
राज्यातील ४९७ आश्रमशाळांमध्ये अधिकाऱ्यांचा हा पहिलाच मुक्काम आहे. यामुळे आश्रमशाळांच्या सुविधा सुधारण्यास आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व राहणीमान उंचावण्यास मदत होईल.