ताज्या घडामोडी

अनिकेत, समीक्षा आमटे दाम्पत्याला प्रेस क्लबचा जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर

गडचिरोली, ता. २० : कर्मयोगी श्रद्धेय बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वारसा चालविणाऱ्या तिसऱ्या पिढीतील अनिकेत व समीक्षा आमटे दाम्पत्याला प्रेस क्लबचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
गडचिरोली प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागात लोकबिरादरीच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या तसेच वन्यप्राण्यांचे अनाथालय चालवणाऱ्या आमटे परीवारातील अनिकेत व समीक्षा आमटे या दाम्पत्याला गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्काराचे वितरण सोमवार ६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. जिल्हा गौरव पुरस्कार घोषित झाल्याबद्दल प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर, उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव रूपराज वाकोडे, सहसचिव सुरेश नगराळे , कोषाध्यक्ष शेमदेव चापले, कार्यकारणी सदस्य सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, मिलिंद उमरे, निलेश पटले, विलास दशमुखे, मनोज ताजने सहयोगी सदस्य नंदकिशोर पोटे, आशीष अग्रवाल, इरफान शेख, रोमीत तोंबर्लावार, मनीष कासर्लावार, संदीप कांबळे आदींनी अभिनंदन केले आहे.

अल्प परिचय

बाबा आमटेंनी वसवलेलं आनंदवन, डॉ. प्रकाश आमटेंनी वसवलेलं हेमलकसा आणि आता अनिकेत आमटे नेलगुंडा वसवण्याच्या मागे लागलेत. आमटेंची ही तिसरी पिढी.
अनिकेत आमटे :-
संचालक – लोक बिरादरी प्रकल्प २००२ पासून
संचालक – लोक बिरादरी प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा, हेमलकसा, बांबू हस्तकला केंद्र आणि लोक बिरादरी डेअरी.
विश्वस्त – महारोगी सेवा समिती, वरोरा २००८ पासून
थोर समाजसेवक असलेले डाॅ. प्रकाश व डाॅ. मंदाकिनी आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे आजोबा, आजीसह आई, वडीलांचा समाजसेवेचा वारसा जपत माडिया, गोंड जमातीच्या सर्वांगीण कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पत्नी समीक्षा आमटे यांच्या सोबत त्यांनी अतिदुर्गम नेलगुंडा येथे शाळा सुरू केली असून जिल्ह्याच्या अतिनिबिड अरण्यात ज्ञानगंगा प्रवाहित केली आहे. तसेच अनेक गावांमध्ये तलाव निर्मिती करून त्या तलावात मत्स व्यवसायासाठी प्रोत्साहन देत जलसाठा वाढविण्यासह अनेक हातांना रोजगार देण्याचे काम ते करत आहेत. ते उत्कृष्ट छायाचित्रकार सुद्धा आहेत.
समिक्षा गोडसे :-
संचालक – लोक बिरादरी प्रकल्प

अनिकेत आमटे यांच्या पत्नी समीक्षा आमटे यांनीही सासरचे समाजसेवेचे व्रत निष्ठापूर्वक सांभाळले आहे. मास्टर ट्रेनर म्हणून सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण, प्रेरक कार्यक्रम, मल्टी मीडिया सेंटरचा विकास, Android आधारित शैक्षणिक ॲपची अंमलबजावणी, विकसित बहु-भाषिक शिक्षण कार्यक्रम (मातृभाषेतून राज्यभाषा-माडिया ते मराठीत संक्रमण सुलभ करण्यासाठी) असे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले आहे. त्या अतिदुर्गम निबीड रानातील नेलगुंडा येथील साधना विद्यालयाच्या संचालिका आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button