ताज्या घडामोडी

तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

गडचिरोली,(जिमाका),दि.18: सध्या तूर पिक हे फुलोऱ्यावर असून बऱ्याच ठिकाणी शेंगा लागून दाणे भरण्यास सुरवात झालेली आहे. मात्र मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तसेच ढगाळ वातावरण तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय योजना करणे आवश्यक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा समावेश होतो. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळया आणि फुले खाऊन नुकसान करतात पुर्ण वाढ झालेली अळी 30 ते 40 मि. मि. लांब, विविध रंग छटेत दिसुन येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तीच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात मोठ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग या पतंगाची अळी 12.5 मि. मि. लांब हिरवट तपकिरी रंगाची असते तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते. शेंगे माशी या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढन्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते. एकात्मिक व्यवस्थापण या तिनही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. प्रति हेक्टर 20 पक्षीथांबे शेतात उभारावेत त्यामुळे पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात. तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत. आर्थिक नुकसानाची पातळी घाटे अळी 5-6 पतंग प्रती सापळा 2-3 दिवसात किंवा 1 अळी प्रती झाड किंवा 5-10 टक्के नुकसान. पिसारी पतंग 5 अळ्या 10 झाडे अशी आर्थिक नुकसान धोक्याची पातळी गाठताच खालील उपाययोजना कराव्या.
शेंगे माशी 5 ते 10 टक्के नुकसानग्रस्त दाणे पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असतांना) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडिरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली किंवा एच.ए.एन.पि.व्ही (1x 100 पिओबी/मिली) 500 एल.ई./हे. किंवा बॉसिलस थुरिंनजिएंसिरा 15 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी., 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी) इमामेक्टीन बेंझोएट 5 एस.जी. 3 ग्रॅम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 5 टक्के ईसी 10 मिली किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. प्रवाही 2.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी वरील अळीचे वेळीच नियंत्रण करावे असे आवाहन मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ, अकोला किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदीरवाडे तसेच कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी केले आहे.

0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button