ताज्या घडामोडी

पोलीस कर्मचाऱ्याच्या एके-47 रायफलमधून सुटलेल्या 8 गोळ्यांनी मृत्यु

गडचिरोली : येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश वसंत कुळकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्र पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या एके-47 रायफलमधून धडाधड सुटलेल्या तब्बल 8 गोळ्यांच्या आवाजाने जिल्हा न्यायालयाचा परिसर हादरून गेला. ही घटना आज (बुधवारी) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. यात पोलीस कर्मचारी उमाजी होळी (42 वर्ष) यांना 3 ते 4 गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत रुजू झालेले जिल्हा सत्र न्यायाधिश वसंत कुळकर्णी यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनासोबत सशस्र पोलीस कर्मचाऱ्यांचे एक वाहन नेहमीसाठी तैनात असते. दुपारी लंच ब्रेकनंतर न्या.कुळकर्णी यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून जिल्हा न्यायालयात सोडल्यानंतर सुरक्षा रक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारात पार्क करण्यात आले होते. चालकासह तीन सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरले, पण उमाजी होळी हे गाडीतच बसून होते. थोड्याच वेळात गाडीतून धडाधड फायरिंग होत असल्याच्या आवाजाने सर्वांचे लक्ष तिकडे वेधल्या गेले.

सुरूवातीला 3 गोळ्यांचे आवाज आले. त्यानंतर पुन्हा काही गोळ्यांचे आवाज आले. प्रत्यक्षात होळी यांच्या बंदुकीतून 8 गोळ्या सुटल्या होत्या. गोळ्या सुटत असताना गाडीजवळ जाणे धोक्याचे असल्याने खाली उतरलेले सुरक्षा रक्षक जवळ गेले नाही. पण आवाज थांबल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी तीन गोळ्या लागलेल्या अवस्थेत मधल्या सीटवर बसलेले उमाजी होळी यांनी स्वत:च गाडीचे दार उघडले. त्याचवेळी बाहेर असलेल्या सोबतच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून रुग्णालयाकडे धाव घेतली. पण अतिरक्तस्राव झाल्याने काही वेळातच होळी यांचा मृत्यू झाला.

एके-47 रायफलमधून सुटलेल्या गोळ्यांपैकी पाच गोळ्या गाडीच्या टपातून बाहेर आल्या, तर तीन गोळ्या बाजुच्या व मागील बाजुने बाहेर निघाल्या.

ही घटना आत्महत्या आहे की अपघात हे स्पष्ट होऊ शकले नाही. उमाजी होळी हे कालच सुटीवर परतले होते. ते एकटेच गाडीत बसून का होते, एकाचवेळी एवढ्या गोळ्या कशा चालल्या, चुकून रायफलचा ट्रिगर दबून ही घटना अपघाताने घडली का, या प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button