ताज्या घडामोडी

*लोकसभा निवडणूक 2024* *गडचिरोली जिल्ह्यासाठी 2613 शाईच्या बाटल्या*

 

*• महाराष्ट्रासाठी 2 लाख 15 हजार 850 शाईच्या बाटल्यांची तरतूद*

गडचिरोली, दि. 13 : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याकरिता 2613 बाटल्या प्राप्त झाल्या आहेत. तर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघाकरिता सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आरमोरी , गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 950 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे एकूण १९०० शाईच्या बाटल्यांची आवश्यकता होती, त्यासोबतच अतिरिक्त ७१३ मिळून एकूण २६१३ शाईच्या बाटल्या जिल्ह्याकरिता मिळाल्या आहेत. मतदानासाठी आवश्यक साहित्यासोबतच शाईच्या बाटल्या मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणेमार्फत पोहोचत्या करण्यात येणार आहेत.
मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.
मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.
००००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button