गडचिरोली गौरव पुरस्कार हा माझ्या संघर्षमय जीवनाचा सन्मान – माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे

गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारदिन उत्साहात
गडचिरोली, ता. ६ : न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाल्यानंतर पुढे न्यायाधीश ते धर्मदाय आयुक्त ते मुंबईच्या महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपीठाच्या न्यायिक सदस्य पदापर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. पण, गडचिरोली जिल्ह्यातील जन्मभूमीची प्रेरणा सतत मिळाली. आपल्या या गृह जिल्ह्यातील जिल्हावासींचे प्रेम, आस्था आजही कायम आहे याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. त्यामुळे गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने देण्यात आलेला हा गडचिरोली गौरव पुरस्कार माझ्या संघर्षमय जीवनाचा सन्मान आहे, असेच मी मानतो, असे भावोद्गार माजी धर्मदाय आयुक्त तथा मुंबईच्या महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपीठाचे न्यायिक सदस्य प्रमोद तरारे यांनी काढले.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार (ता. ६) आयोजित पत्रकार दिन सोहळ्यात गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने माजी धर्मदाय आयुक्त तथा मुंबईच्या महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडीपीठाचे न्यायिक सदस्य प्रमोद तरारे यांचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे होते. तसेच विशेष पाहुणे म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, डॉ. संगीता तरारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते प्रमोद तरारे यांना सन्मानचिन्ह व शाल देत त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमोद तरारे यांनी न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे नोकरीचा राजानामा देत वकील म्हणून गडचिरोलीत कार्यरत असतानाच २००८ मध्ये जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची जालना येथे नियुक्ती झाली. त्यानंतर यवतमाळ, औरंगाबाद, वैजापूर व नागपूर येथे ते कार्यरत होते. पुढे त्यांनी अतिरिक्त प्रधान न्यायमूर्ती मुंबई शहर व विशेष न्यायाधीश सीबीआय म्हणून कार्य केले. त्यानंतर २०१८ ते २०२१ पर्यंत ते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदूरबार या पदावर कार्यरत होते. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले की, गडचिरोली जिल्हा मागास, नक्षलग्रस्त म्हणवला जात असला, तरी या निसर्गरम्य जिल्ह्यात सोन्यासारखे हृदय असणार्या व्यक्ती आहेत. येथून अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत न्या. तरारे यांनी मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रेस क्लबने अतिशय योग्य व्यक्तीचा सन्मान केला असून अशीच या भूमीतील रत्ने शोधून त्यांना सन्मानित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, आज इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर समाजमाध्यमांचे प्रस्थ वाढताना दिसत असले तरी वृत्तपत्रासारख्या मुद्रीत माध्यमांचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. वृत्तपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली असून आजही समाज वृत्तपत्रांनाच सन्मान देतो, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनीही उत्तम कार्यक्रमाचे आयोजन करत गडचिरोलीचे भूमिपुत्र असलेले प्रमोद तरारे यांचा सत्कार केल्याबद्दल प्रेस क्लबचे कौतुक केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर काथवटे यांनी पत्रकारितेचा इतिहास, वृत्तपत्रांचे महत्त्व व समस्या यावर विचार व्यक्त केले. प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी केले, संचालन मिलिंद उमरे व आभार प्रेस क्लबचे सचिव नीलेश पटले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष शेमदेव चाफले, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सहसचिव अरविंद खोब्रागडे, रोहिदास राऊत, सुरेश नगराळे, मनोज ताजने, अनिल धामोडे, रूपराज वाकोडे, विलास दशमुखे आदींनी सहकार्य केले.
गीतगायन स्पर्धेत आर्या आखाडे प्रथम…
पत्रकारदिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीने आयोजित गीतगायन स्पर्धेचे प्रथम बक्षीस आर्या विनोद आखाडे यांनी पटकावले. द्वितीय बक्षीस चैतन्य अविनाश गौरकार व तृतीय बक्षीस हर्ष घ्यार यांनी प्राप्त केले. तसेच कात्यायनी मुनघाटे, अपर्णा दरडे, उन्नती म्हशाखेत्री यांना प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त झाले. या स्पर्धेचे परीक्षण मारोतराव इचोडकर, तुलाराम राऊत व श्री. धात्रक यांनी केले.
—————————————-