ताज्या घडामोडी

*भामरागड उपविभागातील विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा*

*पर्यटनास चालना देण्यावर भर*

गडचिरोली दि.१७: जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज भामरागड तालुक्याचा सविस्तर दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा आणि या भागातील पर्यटनाचा विकास प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुलगौतम या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या ‘त्रिवेणी संगम’ या पर्यटन स्थळाला भेट दिली. हे स्थळ विकसित करण्याबाबत त्यांनी उपवनसंरक्षक शैलेश मिना यांच्याशी सविस्तर चर्चा करून पर्यटन विकास कामांचा आढावा घेतला. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाकडे ‘झुडपी जंगल’ म्हणून अधिसूचित झालेले क्षेत्र वन विभागाच्या यादीतून कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलदगती कार्यवाही सुरू केली आहे. विशेषतः १२ डिसेंबर १९९६ पूर्वी वाटपाद्वारे हस्तांतरित झालेले किंवा अतिक्रमित असलेले क्षेत्र नियमित करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असून, या संदर्भात जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पास भेट देऊन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, लोकबिरादरी प्रकल्प हा दुर्गम भागातील विकासाचा एक आदर्श असून प्रशासन अशा सामाजिक कार्याला नेहमीच सहकार्य करेल. त्यानंतर त्यांनी देवराई वन धन विकास केंद्राला भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित कलाकृतींची पाहणी केली. या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाव मिळावा यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तालुक्यातील सर्व कार्यालयांच्या प्रमुखांशी चर्चा करताना, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याच्या सूचना दिल्या.
या दौऱ्यात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी अमर राऊत, तहसीलदार किशोर बागडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी अभिजित सोनावणे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button