ताज्या घडामोडी

*मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘बायफ’ च्या माध्यमातून एसबीआय फाउंडेशनचा एटापल्लीत ‘उपजीविका विकास’ प्रकल्पाला हातभार; 1,500 कुटुंबांना मिळणार शाश्वत आधार*

गडचिरोली: दि. ७ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम एटापल्ली तालुक्यात महत्त्वाकांक्षी ‘एकात्मिक उपजीविका विकास’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. बायफ (BAIF) डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प एसबीआय फाउंडेशनने पुरस्कृत केला आहे.
1 एप्रिल 2025 पासून 3 वर्षांसाठी सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी ₹4.95 कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे. एटापल्ली तालुक्यातील 20 गावांना लक्ष्य करून, सुमारे 1,500 कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मुख्य उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे. हवामान-अनुकूल शेतीला प्रोत्साहन देणे, उपजीविका सुधारणे आणि निवडक गावांमधील समुदायाची समृद्धी वाढवणे, हे या उपक्रमाचे मूळ केंद्र आहे.
या प्रकल्पात चालू वर्षासाठी 500 कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यासोबतच, जलसंधारण वाढवण्यासाठी 15 बोडींमधील (नैसर्गिक शेततळी) गाळ काढण्याचे कामही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पात ‘नैसर्गिक शेततळी-आधारित शेती प्रणाली’ या अभिनव संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ही प्रणाली एकात्मिक दृष्टिकोन वापरते, जिथे शेततळीत मासेपालन केले जाते, शेततळ्याच्या वर कुक्कुटपालन करून कोंबड्यांचे खत माशांसाठी नैसर्गिक खाद्य म्हणून वापरले जाते आणि त्याच पाण्याचा उपयोग नजीकच्या पिकांना सिंचनासाठी केला जातो. हा मॉडेल पाण्याचा कार्यक्षम वापर सुनिश्चित करतो आणि कृषी उत्पादकता वाढवून ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध करतो. 2027-28 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, 1,500 कुटुंबांना शाश्वत आर्थिक आधार मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button