*जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन*
गडचिरोली दि १४: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत, आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल, ता. जि. गडचिरोली येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांना बाल दिन साजरा करणे, बालकांसाठी बालस्नेही कायदेशीर सेवा, सायबर गुन्हे, बालकांचे अधिकार, मादक पदार्थांचे सेवन, शिक्षणाचा अधिकार आणि शाळांमध्ये पॉक्सो कायदा यासारख्या महत्त्वाच्या कायदेविषयक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. अॅड श्री. वाय. एन. चेके, सहाय्यक न्यायरक्षक, न्यायरक्षक कार्यालय, गडचिरोली, यांनी बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा-२०१२ आणि मादक व अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांसाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी जारी केलेला टोल फ्री क्रमांक १५१०० याचीही माहिती दिली.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री. अं. पुं. खानोरकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, मुलांकरीता असलेल्या मोफत कायदेशीर सेवा, बालकांचे अधिकार आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांची आशा व डॉन (DAWN) योजना यावर मार्गदर्शन केले. त्यांनी बालक दिनाच्या उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.
यावेळी श्रीमती अल्का पांडुरंग जुआरे, मुख्याध्यापिका, तसेच श्री. राजेश चिलमवार, विषय शिक्षक, आणि श्रीमती हिरा दुंधलवार, शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल हे उपस्थित होते. शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथील शिक्षिका श्रीमती हिरा दुंधलवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. राजेश चिलमवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोटगल येथील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

