*’मिशन संपूर्ण’ : नॉन पेसा क्षेत्रातील मातांसाठी ‘संपूर्ण’ आहाराची सुविधा*

गडचिरोली दि. ११: आदिवासी विकास विभागाच्या वतीने पेसा क्षेत्रात राहणाऱ्या गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना लागू आहे. या योजनेद्वारे या मातांना अंगणवाडी केंद्रांमार्फत एकवेळ चौरस आहार पुरवला जातो. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांसाठी अशा प्रकारची कोणतीही योजना उपलब्ध नव्हती. पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील ही दरी भरून काढण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने वेस्टर्न कोल फिल्ड यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एकवेळ चौरस आहार पुरवण्यासाठी “मिशन संपूर्ण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
*योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि व्याप्ती*
* उद्देश: गडचिरोली जिल्ह्यातील नॉन-पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना अंगणवाडी केंद्रांमार्फत एकवेळ चौरस आहार पुरवणे.
* निधी स्रोत: या मिशनसाठी लागणारा संपूर्ण निधी वेस्टर्न कोल फिल्ड च्या CSR निधीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* समाविष्ट तालुके: या योजनेत आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील नॉन-पेसा क्षेत्राचा समावेश आहे.
* कालावधी: ‘मिशन संपूर्ण’ ची सुरुवात ऑक्टोबर २०२५ मध्ये झाली असून हे मिशन पुढील पाच महिने, म्हणजेच फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
* लाभार्थी संख्या: या मिशनमध्ये एकूण ३९७ अंगणवाडी केंद्रांतील सुमारे १३५० गरोदर स्त्रिया आणि सुमारे १४०० स्तनदा माता यांना लाभ मिळणार आहे.
* आहाराचे स्वरूप: मिशन अंतर्गत नॉन-पेसा क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात नोंदणीकृत गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना एकवेळ संपूर्ण चौरस आहार दिला जातो. यात भात, पोळी, वरण, अंडी/केळी, आणि शेगदाणा लाडू/चिक्की यांचा समावेश आहे.
या मिशनमुळे नॉन-पेसा भागातील मातांना पोषण आणि आधार मिळेल, ज्यामुळे माता आणि बालकांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होईल, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी व्यक्त केले असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक बानाईत यांनी कळविले आहे.

