ताज्या घडामोडी

*एलएमईएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वाचविले पोलीस कर्मचाऱ्याचे प्राण, स्वतः हेलिकॉप्टर उडवून आणले हेडरीहुन नागपूरला*

कोनसरी:
गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम पोलिस ठाण्यात हृदयविकाराचा झटका आलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने उपलब्ध करून दिलेल्या हेलिकॉप्टरमधून हेडरी हुन नागपूरला नेण्यात आल्यामुळे त्याचे प्राण वाचले. एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी स्वतः हेलिकॉप्टर उडवले आणि सतर्कता, वेळेवर गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेची उपलब्धता, आणि सहाय्यतेतील तत्परता ह्याचे उल्लेखनीय उदाहरण प्रस्तुत केले.
२ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या त्यांच्या भेटीदरम्यान, श्री. प्रभाकरन सुरजागड लोहखनिज खाणींच्या नियमित तपासणीसाठी हेडरी येथे गेले होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, एसआरपीएफ ग्रुप-२ मध्ये कार्यरत असलेले आणि हेडरी पोलिस ठाण्यात तैनात असलेले पोलिस नाईक श्री. राहुल साहेबराव गायकवाड (३७) छातीत दुखत असल्याची तक्रार घेऊन लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात गेले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर केलेल्या इलेक्ट्रोकार्डियोग्राममध्ये (ईसीजी) त्यांना अँटीरियर लॅटरल वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन (हृदयविकाराचा झटका) आल्याचे दिसून आले.
रुग्णाला ताबडतोब अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले, जिथे त्यांना अँटीप्लेटलेट औषधाचा लोडिंग डोस आणि लो मॉलिक्युलर वेट हेपरिनचे इंजेक्शन देण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, रुग्णाला तातडीने विशेष हृदयोपचार रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता होती. वेळ कमी होता. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी, पोलिस विभागाने एलएमईएलच्या शीर्ष व्यवस्थापनाशी संपर्क साधून श्री. गायकवाड यांना नागपूरमधील विशेष हृदयोपचार रुग्णालयात वैद्यकीय स्थलांतरासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची विनंती केली.
सदर पोलिस कर्मचाऱ्याला नागपूरला नेण्यासाठी श्री. बी. प्रभाकरन यांनी एलएमईएलचे हेलिकॉप्टर तातडीने उपलब्ध करून दिले. दुपारी २:४५ वाजता, हेलिकॉप्टर हेडरी सशस्त्र पोलीस चौकीच्या हेलिपॅडवर उतरले आणि रुग्णाला घेऊन नागपूरला रवाना झाले. श्री. प्रभाकरन यांनी स्वतः पायलटची जागा घेतली आणि हेलिकॉप्टर सकुशल नागपूरला पोहचविले, हे येथे उल्लेखनीय.
श्री. प्रभाकरन यांना विमान उड्डाणाची आवड आहे आणि त्यांच्याकडे विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीसाठी खाजगी पायलटचा परवाना आहे. तसेच, त्यांना एक दशकाहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांच्या सर्व बैठका पुनर्नियोजित करून, ते पोलिस कर्मचाऱ्याला नागपूरला घेऊन गेले.
हेडरी-नागपूर हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान, रुग्णाच्या प्रकृतीचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासाठी रुग्णालयातील नर्सिंग कर्मचारी सोबत होते. दुपारी ३:४० च्या सुमारास हेलिकॉप्टर नागपूर विमानतळावर उतरले, जिथे ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील एक क्रिटिकल केअर रुग्णवाहिका रुग्णाला हलवण्यासाठी वाट पाहत होती. तपासणीदरम्यान रुग्णाची एक धमनी ब्लॉक असल्याचे आढळून आले. रुग्णाची स्थिती नियंत्रणात आणल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी स्टेंट यशस्वीरित्या बसवण्यात आला. ५ ऑगस्ट रोजी रात्री त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. श्री. गायकवाड यांना वेळेवर मदत मिळाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमधील गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, एलएमईएल ने वेळेत उपलब्ध करून दिलेले हेलिकॉप्टर, आणि श्री. प्रभाकरन ह्यांची गडचिरोलीतील लोकांच्या मदतीला धावून जाण्यातील तत्परता ह्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे प्राण वाचले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button