*हवामान बदलावर बांबूची लागवड हाच उपाय; शेतकऱ्यांनी बांबू लागवड अनुदान योजनेचा लाभ घ्यावा – पाशा पटेल यांचे आवाहन*
गडचिरोली दि. ३ : दिवसेंदिवस वाढणारे तापमान, कमी होणारी जंगले आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीत मोठं नुकसान होत आहे. वाढलेल्या तापमानाचा फळबागा आणि शेतीतल्या इतर पिकांवरही नकारात्मक परिणाम होत आहे, ज्यामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे. यावर एक प्रभावी आणि शाश्वत उपाय म्हणून बांबू लागवडीकडे पाहिलं जात आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष श्री पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन केलं आहे.
वडसा येथे आयोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेत श्री पाशा पटेल बोलत होते. यावेळी तहसीलदार प्रिती डुडुलकर, सहाय्यक उपवनसंरक्षक अरूण सुर्यवंशी तसेच महसूल, वन, कृषी व औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
वाढत्या तापमानाला आणि हवामान बदलाला तोंड देण्यासाठी बांबूची लागवड हा एक चांगला उपाय आहे. बांबू पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो. सोबतच, बांबूची लागवड अनेक अर्थांनी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. इतर फळझाडे आणि पिकांना वन्य प्राण्यांचा जास्त धोका असतो, ज्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतं. मात्र, बांबू लागवडीमुळे हा धोका कमी होतो, असं पाशा पटेल यांनी सांगितलं.
बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार रोजगार हमी योजनेअंतर्गत विशेष अनुदान देत आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो, कारण बांबूला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. याचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये होतो, त्यामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकते.
श्री पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, त्यांनी या शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि बांबूची लागवड करून हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यास मदत करावी.
०००