ताज्या घडामोडी

*मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात चाळीस लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ*

*२२ जुलैपासून ‘वृक्ष लागवड पंधरवडा’; एक कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा पहिला टप्पा*

गडचिरोली, दि. 18 : “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाने एक कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट दिले असून, या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २२ जुलै रोजी गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात ‘वृक्ष लागवड पंधरवडा’ सुरू करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात ४० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज यंत्रणांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी वृक्ष लागवडीनंतर झाडे जिवंत राहण्यासाठी प्रत्येक झाडाची एक वर्षांची जबाबदारी निश्चित करण्याचे सांगितले. केवळ वृक्षारोपण नव्हे तर त्याचे संरक्षण व संवर्धन हाच खरा पर्यावरण पूरक दृष्टिकोन असून, यासाठी शासकीय यंत्रणा आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गडचिरोली जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेले एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्यातील पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्याची यशस्वी अंमलबजावणी वृक्ष लागवड पंधरवड्याच्या माध्यमातून करायची आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, वनसंवर्धन क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी या अभियानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

बैठकीत या मोहिमेच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून विविध विभागांना समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजीत यादव, नमन गोयल, कुशल जैन, अप्पर पोलीस अधीक्षक आर. रमेश, उपवनसंरक्षक श्रीमती आर्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, स्मिता बेलपत्रे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी संजय त्रीपाठी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button